वसमत – वसमत शहरात जिल्हा पोलिस अधीक्षक व शहर पोलिस पथकाच्या संयुक्त कारवाईत ७ लाख रुपयांच्या सुगंधीत गुटख्याचं घबाड सापडलं. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. मात्र आरोपी पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई मंगळवार ता.२२ सायंकाळच्या सुमारास केली गेली.
वसमत शहरात मागील काही महिन्यांपासून अवैध व्यवसायाचा उत आला आहे. हिंगोलीचे नुतन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्याचे सुत्र हाती घेताच पथके स्थापन करुन अवैध व्यावसायावर लगाम लावण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक पथक व शहर पोलीस पथकाने शहरातील श्रीनगर भागातील भिमाशंकर तुपकरी यांच्या गोदामावर छापा मारला असता तेथे सुगंधीत गुटख्याचे मोठे घबाड सापडले.
या छाप्यात ४ लाख रुपयांचा मुसाफिर गुटखा, १ लाख ५६ हजार रुपयांचा गोवा गुटखा, ६५ हजार रुपयांचा राजनिवास गुटखा, ६० हजार रुपयांचा राजकमल गुटखा असा मिळून ६ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा पोलिस पथकांनी जप्त केला. आरोपी मात्र पोलिसांना पाहून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सतिश ठेंगे यांच्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बी. जी. महाजन करीत आहेत.
Add Comment