देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे शनिवारी ता. १ महाशिवरात्री महोत्सवात रात्री दहा वाजता हर हर महादेवच्या गजरात रथोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी नागनाथांची उत्सवमुर्ती रथामध्ये ठेऊन मंदिराला पाच प्रदक्षिणा घेण्यात आल्या. यावेळी सुमारे १ लाख भाविकांची उपस्थिती होती.
औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सव सुरु आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सुमारे अडीच लाखा पेक्षा अधिक भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या रथोत्सवासाठी आज सकाळ पासूनच भाविक मंदिरात एकत्र येण्यास सुरवात झाली होती. तत्पुर्वी नागनाथ संस्थानकडून रथाची तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर आकर्षक फुलांनी रथाची सजावट करण्यात आली.
दरम्यान, रात्री आमदार संतोष बांगर, देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास नागनाथाची उत्सवमुर्ती रथामध्ये ठेवल्यानंतर प्रदक्षिणा घेण्यास सुरवात झाली. हर हर महादेव, बम बम भोले, नागनाथ महाराज की जय, ओम नमः शिवायच्या गजराने परिसर दणाणून गेला होता. या रथोत्सवात भजनी मंडळी, बॅण्ड पथक, विद्यार्थ्यांचे पथक सहभागी झाले होते. यावेळी सुमारे एक लाखापेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती होती.
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, नगराध्यक्ष सपना कनकुटे, उपनगराध्यक्ष अनिल देव, वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. सुनील भुक्तार, मुख्य पुजारी श्रीपाद भोपी, नारायण भोपी, आदित्य भोपी, शेखर भोपी, सुरेंद्र डफळ, वैजनाथ पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंदिराला पाच प्रदक्षिणा घेण्यात आल्या. रथोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
रविवारी होणार काल्याचे किर्तन महाशिवरात्री यात्रा महोत्सवात रविवारी ता. २ सकाळी काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने यात्रा महोत्सवाची सांगता होणार असल्याचे संस्थानच्या सुत्रांनी सांगितले.
Add Comment