हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु जाली असून पहिल्याच दिवशी मंगळवारी तीनही विधानसभा मतदार संघात एकूण १५३ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. तर एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीसह वसमत व कळमनुरी विधानसभा मतदार संघात निवडणुक होत आहे. या निवडणुकीत अद्यापपर्यंत उमेदवारांच्या उमेदवारीचा घोळ सुरुच आहे. त्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सूकता जिल्हावासीयांना कायम आहे. मात्र वसमतमध्ये दुरंगी तर हिंगोली व कळमनुरी विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या निवडणुकीत मंगळवारपासून उमेदवारी अर्ज विक्री व अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने निवडणुक विभागाने अर्ज विक्री व स्विकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत. तीनही विधानसभा मतदार संघात हे कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या शिवाय उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुक, बँड पथक, ध्वनीक्षेपक, बॅनर लावणे यासाठी लागणारी परवानगी वेळेत उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व विभागांची नाहरकत प्रमाणपत्रे दिली जात आहेत.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी ता. २२ दुपारी तीन वाजेपर्यंत १५३ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघात २१ उमेदवारांनी संघात ४३ अर्ज घेतले आहेत. कळमनुरी विधानसभा मतदार संघात ४४ अर्ज घेण्यात आले तर तर हिंगोली विधानसभा मतदार संघात २९ उमेदवारांनी ६६ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.. मात्र आज एकही अर्ज दाखल झाला नाही. या निवडणुकीत उमेदवारांनी आता मुहुर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरु केली असून गुरुवारी ता. २४ सर्वात जास्त अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
Add Comment