विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली खरी; पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेत्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर धाव घेतली. आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेत्यांना भंडावून सोडले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप नेत्यांनी अनेकांना उमेदवारीचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानुसार तिकिटांचे वाटप झाले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये रोष वाढला होता. उमेदवारीबाबत फेरविचार केला नाही तर बंडखोरी करण्याचा इशाराही काही नेत्यांनी दिला.
दुसरीकडे ज्या विद्यमान आमदारांची नावे पहिल्या यादीत नव्हती, त्यांनाही तिकीट कापण्याची चिंता अाहे. त्यांनीही दुसऱ्या यादीत नाव आहे का नाही याची फडणवीसांकडे चौकशी केली. निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे डॅमेज कंट्रोलमध्ये व्यग्र होते. मात्र नाराज नेत्यांचे समाधान त्यांच्या बोलण्यातून होऊ शकले नाही. फडणवीस व गिरीश महाजन यांच्याकडे नाराजांना समजावण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र आता यादी बदलणार नसल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले.
देवयानी फरांदे / राम सातपुते
नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे पहिल्या यादीत नाही नाही. त्यांनी २४ नगरसेवकांसह शक्तिप्रदर्शन केले. तर सोलापूर मध्यचे आ. राम सातपुते यांना स्थानिक पातळीवर विरोध असल्याने ते फडणवीसांना भेटले.
डॉ. राहुल आहेरदे
वळा-चांदवडमधून उमेदवारी मला नको, चुलतभाऊ केदा यांना द्या, असे साकडे आमदार राहुल आहेर यांनी घातले. मात्र पक्षाचा सर्व्हे केदा यांना अनुकूल नसल्याचे सांगत डॉ. राहुल यांनाच तिसऱ्यांदा लढण्याचे आदेश देण्यात आले.
बबनराव पाचपुते
श्रीगोंद्यातून आमदार बबनराव पाचपुते यांच्याएवजी पत्नी प्रतिभा यांना तिकीट दिले आहे. मात्र हे दोघेही आपला मुलगा विक्रमसिंह यांना तिकीट मिळावे यासाठी साकडे घालण्यास गेले होते. पण फडणवीसांनी त्यांना परत पाठवले.
भारती लव्हेकर / मंदा म्हात्रे
यादीत नाव नसल्याने वर्सोवाच्या आमदार भारती लव्हेकर आल्या होत्या. तर यादीत नाव असूनही गणेश नाईकांच्या मुलाकडून बंडखोरीचा धोका असल्याने मंदा म्हात्रे यांनीही फडणवीस यांना भेटून नाराजी व्यक्त केली.
राज पुरोहित / गोपाळ शेट्टी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाब्यातील उमेदवारीस विरोध करत माजी मंत्री राज के. पुरोहित फडणवीसांना भेटले. माजी खासदार गोपाळ शेट्टी बोरिवलीचे आमदार सुनील राणेंविरोधात मोर्चेबांधणीसाठी आले होते.
सर्वांनाच उमेदवारी मिळेल असे नाही, नाराजांची समजूत काढू : गिरीश महाजन
तिकिटे कापण्याची आमदारांना धास्ती आहे का? गिरीशम हाजन : पहिल्या उमेदवार यादीत नाव नाही म्हणजे नंतरच्या यादीत येणारच नाही असे नाही. पक्षनेतृत्व प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार करत आहे. भाजपत अनेक इच्छुक नाराज झाले आहेत? महाजन : एका जागेवर एकालाच तिकीट मिळू शकते. पण काही जागांवर जास्त जण इच्छुक अाहेत. तिथे इतरांना समजावून सांगत आहोत. यातून मार्ग निघेल. महायुतीत काही जागांवरून वाद अाहेत का? महाजन : कल्याण पूर्वसारख्या काही जागा आहेत जिथे वाद आहेत. तिथे भाजपलाच उमेदवारी मिळावी असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. काही ठिकाणी स्थानिक वाद आहेत. अशा ठिकाणी महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून लवकरच मार्ग काढतील. पण पहिल्या यादीनंतर तक्रारींची संख्या वाढतेय? महाजन : सगळेच लोक तक्रारीसाठी येत आहेत असे नाही. अनेक जागांवर आमच्या पक्षाचे प्रमुख दावेदार आहेत. हे नेते अनेक वर्षांपासून तिथे कार्यरत आहेत. त्यामुळे इच्छा व्यक्त होणे स्वाभाविक आहे. अशा कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Add Comment