हिंगोली सह नांदेड परभणी लातूर या जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाहेर राज्यातून होणारी दारूची वाहतूक रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या लगत तेलंगणा व कर्नाटकाच्या सीमेवर पोलीस उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने चार तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या
राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.बनावट व परराज्यातून कर बुडवून येणाऱ्या देशी व विदेशी दारू विरुद्ध पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग हे आता संयुक्तपणे कारवाई करणार आहेत.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचे पार्श्वभूमीवर, नांदेड परिक्षेत्रातील, उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी ता २२ नांदेड येथे आढावा घेतला.
यावेळी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी मागील दोन महिन्यांत दारूबंदी संदर्भात पोलिसांनी केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. नांदेड परिक्षेत्रातील हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर पोलिसांनी मागील दोन महिन्यात, गावठी दारूचे गाळप रोखण्याकामी मोहिम राबवली. यामध्ये पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून, गावठी दारू गाळणाऱ्या इसमांविरुद्ध एकूण 1034 केसेस केल्या असून, 59,69,519 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती दिली.तेलंगणा व कर्नाटक राज्यांचे सीमेवर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे चार संयुक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. सदर तपासणी नाक्यांवरून परराज्यातील अवैधपणे व कर बुडवून येणारी दारू राज्यात येऊ नये, म्हणून प्रयत्न होणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया प्रलोभन विरहित होण्याकरिता, हातभट्टी गाळप करणारी ठिकाणे, बनावट दारू बनविणारे अड्डे यांचेसह विविध प्रकारची दारू राज्यात आणणारी रॅकेट्स उध्वस्त करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रातील पोलीस व उत्पादन शुल्क विभाग संयुक्तपणे कारवाई करणार असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.यावेळी उत्पादन शुल्क विभागाचे सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त तडवी, अधीक्षक गणेश पाटील, केशव राऊत, आदित्य पवार व चारही जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांची उपस्थिती होती.
Add Comment