कुरुंदा ते उमरा मार्गावर नेहरूनगर शिवारात पोलिस व्हॅन उलटून झालेल्या अपघातात दोन अधिकारी व एक चालक कर्मचारी जखमी झाल्याची घटना सोमवारी ता. २१ सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी अधिकाऱ्यांवर उपचार करून घरी पाठविण्यात आल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली येथील पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या परिसरात आज सकाळी पोलिस स्मृती दिना निमित्त हुतात्मा पोलिस अधिकारी, कर्मचारी व जवानांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाभरातील पोलिस अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, वसमत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भोसले एकाच वाहनातून आज सकाळीच हिंगोलीकडे निघाले होते. कुरुंदा येथून उमरा मार्गे ते हिंगोली येथे होते. यावेळी कुरुंद्यापासून सुमारे सात ते आठ किलो मिटर अंतरावर त्यांचे वाहन आले असतांना वाहनाचे पाठीमागील टायर अचानक फुटले. त्यामुळे चालक सतीष ढेपे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या खाली जाऊन उलटले. या अपघातात सहाय्यक पोलिस निरीक्षक निरदोडे व भोसले, चालक ढेपे जखमी झाले.या
अपघाताची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे जमादार बालाजी जोगदंड, चालक ढेपे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने वाहनाच्या बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
Add Comment