नवीन मोबाइलसाठी हट्ट करणारा मुलगा घरातून निघून गेल्याने त्याच्या शोधासाठी वडील बाहेर पडले. हट्टी मुलाने आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खचलेल्या पित्याने मुलाचा मृतदेह जड अंतःकरणाने खाली उतरवला. नंतर त्याच दोरखंडाला गळफास घेऊन स्वतः देखील आत्महत्या केली. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना नांदेड जिल्ह्यातील मिनकी (ता. बिलोली) येथे गुरुवारी (९ जानेवारी) सकाळी उघडकीस आली.
राजेंद्र लक्ष्मण पैलवार (४३) व ओमकार राजेंद्र पैलवार (१६) अशी मृत पिता-पुत्रांची नावे आहेत. मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी पैलवार (४३) हे पत्नी व ३ मुलांसह गावात राहतात. त्यांचा मोठा मुलगा बारावी उत्तीर्ण असून तो शेती पाहतो. दुसरा मुलगा उदगीरला अकरावीचे शिक्षण घेत आहे. लहान मुलगा ओमकार हा उदगीर येथेच शंकर माध्यमिक विद्यालयाच्या आश्रमशाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. त्यांच्या कुटुंबात २ एकर जमीन आहे.
त्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक खतगाव शाखेचे ४.५ लाख व काही खासगी कर्ज राजेंद्र पैलवार यांनी घेतले आहे. मोबाइल घेण्यासाठी काही दिवस थांब, असे वडिलांनी ओमकारला सांगितले होते. त्यामुळे ओमकार नाराज होऊन रात्री घराबाहेर निघून गेला होता. नाराज ओमकारने रात्री स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मुलगा घरी नसल्याचे पाहून वडिलांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा शोध घेतला. ते शेताकडे गेले असता त्यांना ही घटना दिसली. त्यामुळे मुलाचा मृतदेह झाडावरून खाली उतरवत राजेंद्र पैलवार यांनीही त्याच दोरखंडाला गळफास घेतला. याप्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
२ दिवसांपूर्वीच गावी आला.
कर्जफेडीची चिंता, नापिकी व मुलांच्या शिक्षणावरील खर्चामुळे पैलवारांच्या कुटुंबाला नेहमी आर्थिक चणचण भासत होती. त्यातच संक्रांतीच्या सणानिमित्त २ दिवसांपूर्वी उदगीरला शिकणारी दोन्ही मुले गावाकडे आली होती. त्यातील ओमकार हा बुधवार ८ रोजी दुपारी वडिलांना नवीन कपडे, शालेय साहित्य व नवीन मोबाइल घेण्यासाठी पैसे मागत होता.
Add Comment