वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे जागेच्या वादातून मंगळवारी सकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाली असून यामध्ये 10 गावकऱ्यांसह 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी 141 जणांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे मागील तीन ते चार वर्षापासून जागेचा वाद आहे. यामध्ये एका गटाने धार्मिकस्थळाची उभारणी केली तर उर्वरीत 13 गुंठे जागे पैकी काही जागा देण्याची मागणी दुसऱ्या गटाने केली होती. त्यामुळे दोन गटात वाद सुरु झाला होता. सदर प्रकरणात महसुल प्रशासनापर्यंत गेले होते. त्यातून अर्जबाजी देखील झाली होती.
त्यानंतर सोमवारी रात्रीच्या सुमारास एका गटाने मोकळ्या जागेवर ध्वज उभारला. सदर प्रकार दुसऱ्या गटाला कळाल्यानंतर तेथे मोठा जमाव एकत्र आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, उपनिरीक्षक संतोष मुपडे, जमादार अंभोरे, शेख जावेद, ढवळे, विजय उपरे, अरविंद राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
वरिष्ठ पोलिस आल्यानंतर जमावावर नियंत्रण मात्र दोन्ही गट आक्रमक झाल्यानंतर दगडफेकीला सुरवात झाली. दोन गटामध्ये पोलिस अधिकारी व कर्मचारी अडकून पडले. तुफान दगडफेकीत १० गावकरी व 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. वरिष्ठ पोलिस अधिकारी आल्यानंतर जमावावर नियंत्रण मिळविण्यात आले.
जखमी पोलिसांना रुग्णालयात केले दाखल या घटनेतील जखमी गावकरी व पोलिस अधिकारी काचमांडे, उपनिरीक्षक मुपडे यांच्यासह कर्मचाऱ्यांना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपनिरीक्षक मुपडे यांच्या तक्रारीवरून दोन्ही गटातील 141 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Add Comment